मुख्य मजकुराकडे जा
भारताचे राजचिन्ह महाराष्ट्र शासनमहाराष्ट्र शासननाशिक जिल्हा · नाशिक जिल्हा
नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळामहाराष्ट्र शासनाची राजमुद्रा
थेट सूचना

सुरक्षा मार्गदर्शक सूचना

सिंहस्थ कुंभमेळा हा एक मोठा धार्मिक मेळावा आहे, ज्यात लाखो भाविक, भक्त आणि अभ्यागत एकत्र येतात. भाविकांना यात्रेची तयारी करण्यासाठी, गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणांतून मार्ग काढण्यासाठी, आपल्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी, आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि अधिकृत सूचनांची माहिती घेत राहण्यासाठी मदत व्हावी, म्हणून या मार्गदर्शक सूचनांमध्ये व्यावहारिक सल्ला दिला आहे. सर्वांचा अनुभव सुरक्षित, सुव्यवस्थित आणि आध्यात्मिकदृष्ट्या समाधान देणारा व्हावा, यासाठी भाविकांनी आपल्या यात्रेचे आधीच नियोजन करावे, अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे आणि आपत्कालीन सेवांतील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येते.

यात्रेचे नियोजन करा

सिंहस्थ हा दीर्घ काळ चालणारा उत्सव असून त्यात फक्त अमृत स्नानांचेच नव्हे, तर इतरही अनेक शुभ दिवस येतात. कमी गर्दीचा दिवस निवडला, तर दर्शन अधिक शांतपणे होते आणि स्नान अधिक सुरक्षित होते.

  • सिंहस्थाचा कालावधी 31 ऑक्टोबर 2026 ते 24 जुलै 2028 असा आहे. अमृत स्नानाचे दिवस नाशिक येथे 2 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि 11 सप्टेंबर 2027, आणि त्र्यंबकेश्वर येथे 12 सप्टेंबर 2027 असे आहेत.
  • स्नानाचे वेळापत्रक, निश्चित केलेले मार्ग, प्रवेशाची ठिकाणे आणि वाहतूक सुविधा तपासून घ्या.
  • निवास, वाहतूक आणि परतीच्या प्रवासाचे आधीच नियोजन करा.
  • अमृत स्नानाच्या दिवशी सर्वाधिक गर्दी असते, आणि हे दिवस भर पावसाळ्यात येतात. गर्दी आणि वाहतुकीच्या परिस्थितीविषयी अधिकृत पाने आणि बातम्यांमधून सतत माहिती घेत राहा.
  • तुम्ही ज्येष्ठ असाल, दिव्यांग असाल, आजारी असाल, गर्भवती असाल किंवा लहान मुलांसोबत प्रवास करत असाल, तर अमृत स्नानाचे दिवस टाळा.
  • फक्त नोंदणीकृत निवासस्थानीच मुक्काम करा, आणि बुकिंग फक्त अधिकृत किंवा विश्वासार्ह माध्यमांतूनच करा. बनावट बुकिंग संकेतस्थळे आणि एजंटांपासून सावध राहा.
  • प्रवासाला निघण्यापूर्वी हवामानाचे इशारे आणि अधिकृत सूचना तपासा.
  • निश्चित केलेली पार्किंग क्षेत्रे आणि प्रवाशांना घेण्याची व सोडण्याची अधिकृत ठिकाणे वापरा.
  • वाहतुकीचे वळण मार्ग, पादचारी मार्ग आणि वाहतूक नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करा.

सामान कमी ठेवा

दाट गर्दीत जड सामानामुळे तुमचा वेग मंदावतो, आणि तुमच्यासह इतरांनाही धोका निर्माण होतो.

  • फक्त 1-2 बॅगा सोबत घ्या. दागिने, मौल्यवान वस्तू आणि जड सामान ठरवलेल्या निवासस्थानीच ठेवा.
  • आवश्यक वस्तू:
    • छायाचित्र असलेले मूळ ओळखपत्र
    • तुमची नेहमीची औषधे
    • रेनकोट (गर्दीत छत्रीपेक्षा चांगला)
    • लहान टॉर्च
    • पाण्याची बाटली
    • कोरड्या कपड्यांचा एक जोड
  • कुटुंबातील प्रत्येक मुलाच्या आणि ज्येष्ठ सदस्याच्या खिशात नाव, फोन नंबर आणि पत्ता (आणि गरज असल्यास आरोग्यविषयक स्थिती) लिहिलेले कार्ड ठेवा.

घाटाकडे जाताना

  • निश्चित केलेल्या, अधिकृत यादीतील घाटांपैकीच तुम्हाला ज्या घाटावर जायचे आहे तो आधीच ठरवा.

गर्दीत

लोक घाई करतात, अरुंद जागेत थांबतात किंवा बॅरिकेडवर रेटा देतात, तेव्हा गर्दीतील बहुतेक दुर्घटना घडतात. संयम हेच सर्वोत्तम संरक्षण आहे, तुमच्यासाठी आणि तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येकासाठी.

  • घाटांकडे चालत जाताना फक्त निश्चित प्रवेश व निर्गमन मार्ग, बॅरिकेड, रांग व्यवस्था आणि अधिकाऱ्यांच्या सूचना यांचेच पालन करा.
  • कुटुंबीय आणि मित्रांसोबत असाल, तर चुकामूक झाल्यास भेटण्यासाठी एक जागा तुमच्या गटासोबत ठरवून ठेवा.
  • गर्दीच्या मार्गांवर प्रवेश करताना आपत्कालीन निर्गमन मार्ग आणि पर्यायी मार्ग ओळखून लक्षात ठेवा.
  • वाटांवर, पुलांवर, घाटांच्या पायऱ्यांवर किंवा अरुंद गल्ल्यांमध्ये, किंवा बॅरिकेडजवळ बसू नका, झोपू नका किंवा थांबू नका.
  • बॅरिकेडवर कधीही चढू नका किंवा ते तोडू नका.
  • गर्दीचा रेटा आला, तर शांत राहा, हात छातीसमोर ठेवा आणि बाजूला सरकत दाबातून बाहेर पडा.
  • अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पसरवूही नका. फक्त अधिकृत घोषणांचेच पालन करा.
  • आखाड्यांच्या मिरवणुकांना वाट द्या. मिरवणुकीचे मार्ग ओलांडू नका.

घाटांवर

  • फक्त दिवसाउजेडीच स्नान करा.
  • खोल किंवा वेगाने वाहणाऱ्या पाण्यात जाऊ नका.
  • पटकन डुबकी घ्या आणि पुढे सरका.
  • पाण्याजवळ मुलांचा हात नेहमी धरून ठेवा.
  • जीवरक्षक, बचाव पथके आणि स्थानिक प्रशासन यांच्या सूचनांचे पालन करा.
  • डोंगरांमध्ये मुसळधार पाऊस पडल्यास किंवा नदीच्या वरच्या भागातील धरणांतून पाणी सोडल्यास गोदावरीची पातळी काही तासांतच वाढू शकते. तुमच्या सुरक्षेसाठी घाट ऐनवेळी बंद केले जाऊ शकतात.
  • घाट बंद असेल किंवा पाण्याची पातळी जास्त असेल, तर तुमचा स्नानाचा ठरलेला दिवस असला तरीही नदीत उतरू नका.

मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती

गर्दीत मुले, ज्येष्ठ व्यक्ती आणि दिव्यांग व्यक्ती सर्वाधिक असुरक्षित असतात, आणि त्यांचीच सर्वांत सहज चुकामूक होते.

  • मुलांना एखाद्या विश्वासू मोठ्या व्यक्तीचे नाव माहीत असेल आणि अधिकृत कर्मचाऱ्यांकडून मदत कशी मागायची हे त्यांना कळत असेल, याची खात्री करा.
  • मुलांच्या आणि ज्येष्ठ व्यक्तींच्या खिशात ओळखीची माहिती लिहिलेला कागद ठेवा.
  • त्यांना तुमच्या जवळ ठेवा, आणि सर्वाधिक दाट गर्दीपासून दूर ठेवा.
  • चुकामूक झाली तर आहे त्याच जागी थांबायचे आणि एखाद्या पोलिसाकडे जायचे, हे मुलांना शिकवा.
  • कोणी हरवल्यास ताबडतोब जवळच्या हरवले-सापडले केंद्रात किंवा पोलीस चौकीत जा.

पावसाळा, पूर आणि दरडी कोसळणे

नाशिक जिल्ह्यात, विशेषतः त्र्यंबकेश्वर आणि आजूबाजूच्या डोंगरांमध्ये, पावसाळ्यात अतिमुसळधार पाऊस पडतो. उतार निसरडे होतात, दरडी कोसळून रस्ते बंद होऊ शकतात, आणि नद्या व नाल्यांना झपाट्याने पूर येऊ शकतो.

  • मुसळधार पाऊस आणि धरणांतून सोडलेले पाणी यांमुळे गोदावरीची पातळी झपाट्याने वाढू शकते. इशाऱ्याचा सायरन किंवा उद्घोषणा ऐकू आल्यावर नदीकाठ सोडा.
  • ब्रह्मगिरी, अंजनेरी किंवा इतर डोंगर रात्री, पावसात किंवा एकट्याने चढू नका. खुणा केलेल्या वाटांवरच राहा.
  • मुसळधार पावसात घाटरस्ते, तीव्र उतार, संरक्षक भिंती, नाले आणि धबधबे टाळा.
  • मुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह वादळ, विजा किंवा जोरदार वारे असताना सूचना मिळाल्यावर निश्चित केलेल्या सुरक्षित निवाऱ्यात जा.
  • पाणी साचणे आणि दरड कोसळणे यांविषयीच्या इशाऱ्यांचे पालन करा, आणि पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून चालत किंवा वाहन चालवत जाऊ नका.
  • ढगांचा गडगडाट होत असताना आणि वीज चमकत असताना एखाद्या इमारतीत किंवा वाहनात जा. झाडे, खांब आणि उघडे जलाशय यांपासून दूर राहा.

उकाडा आणि दमटपणा

पावसाळ्यातील ढगाळ दिवशीही, खचाखच गर्दीतील उकाडा आणि दमटपणा यांमुळे शरीर लवकर थकू शकते.

  • नियमितपणे पाणी प्या, आणि खूप घाम येत असेल तर ओआरएस (ORS) प्या.
  • हलके, सैल सुती कपडे घाला, आणि थेट उन्हात बराच वेळ थांबणे टाळा.
  • चक्कर येणे, डोकेदुखी, उलटी किंवा गोंधळलेली अवस्था ही उष्णतेमुळे होणाऱ्या आजाराची लक्षणे असू शकतात. सावलीत जा आणि ताबडतोब मदत घ्या.

अग्निसुरक्षा आणि विद्युत सुरक्षा

ओलसर वातावरणात विजेचा धक्का बसण्याचा धोका वाढतो.

  • तंबूंमध्ये स्वयंपाक करू नका, किंवा मेणबत्त्या, पणत्या अथवा उदबत्त्या लावू नका.
  • विजेचे खांब, तारा, दिवे किंवा पॅनेल यांना हात लावू नका, विशेषतः ते ओले असताना.
  • ठिणग्या उडणाऱ्या तारा किंवा धूर दिसल्यास ताबडतोब जवळच्या पोलीस किंवा अग्निशमन चौकीला कळवा.
  • तुमच्या शिबिरातून किंवा निवासस्थानातून बाहेर पडण्याचे मार्ग माहीत करून घ्या.

वैयक्तिक सुरक्षा आणि फसवणुकीपासून बचाव

मोठ्या गर्दीकडे खिसेकापू आणि फसवणूक करणारे आकर्षित होतात. सावध राहा आणि फक्त अधिकृत व्यक्तींचीच मदत घ्या.

  • तुमचा फोन आणि पैसे आतल्या खिशात, किंवा समोर धरलेल्या लहान पिशवीत ठेवा.
  • फक्त गणवेशातील पोलीस आणि ओळखपत्र असलेले अधिकारी व स्वयंसेवक यांचीच मदत घ्या.
  • मुले किंवा सामान अनोळखी व्यक्तींच्या हाती सोपवू नका.
  • दर्शन, पास किंवा निवासासाठी पैसे मागणाऱ्या कॉल किंवा संदेशांपासून सावध राहा.
  • अडचणीत असलेल्या महिला आणि मुले कोणत्याही पोलीस चौकीत जाऊ शकतात, किंवा 181 अथवा 1098 वर कॉल करू शकतात.

आदर आणि स्वच्छता

गोदावरी लाखो लोकांसाठी पवित्र आहे. नदी आणि मेळा परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

  • निश्चित केलेली स्वच्छतागृहे, हात धुण्याच्या सुविधा आणि कचरा टाकण्याची ठिकाणे वापरा.
  • प्लास्टिक, अन्नाचा कचरा आणि इतर कचरा निश्चित केलेल्या कचराकुंड्यांत टाका.
  • गोदावरीत साबण, शाम्पू किंवा डिटर्जंट वापरू नका.
  • फुले आणि अर्पण करायच्या वस्तू फक्त निश्चित केलेल्या ठिकाणीच ठेवा.
  • परवानगीशिवाय आखाड्यांच्या शिबिरांमध्ये जाऊ नका. साधूंचा आणि त्यांच्या रीतिरिवाजांचा आदर करा.

माहिती घेत राहा

  • अपडेटसाठी फक्त NTKMA, पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांच्या अधिकृत माध्यमांवरच लक्ष ठेवा.

आपत्कालीन क्रमांक

सेवाक्रमांक
आपत्कालीन सेवा (पोलीस, अग्निशमन, रुग्णवाहिका)112
रुग्णवाहिका108
अग्निशमन101
आरोग्य हेल्पलाईन104
आपत्ती नियंत्रण कक्ष1077
बाल हेल्पलाईन1098
महिला हेल्पलाईन181